कायदेविषयकगुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेष
नागोठणे महिला पोलिसांनी केली “माणुसकीचा झरा” ठरणारी कामगिरी
नागोठणे पोलिसांनी माय लेकीची घडविली भेट

नागोठणे महिला पोलिसांनी केली “माणुसकीचा झरा” ठरणारी कामगिरी
नागोठणे पोलिसांनी माय लेकीची घडविली भेट
महेश पवार
नागोठणे : आजच्या जगात माणुसकी दुर्मिळ झाली आहे असे बोलले जाते. मात्र आजही “माणुसकीचा झरा” जिवंत असल्याची कौतुकास्पद कामगिरी नागोठणे पोलिस ठाण्यातील “दामिनी पथकातील” तीन महिला पोलिस हवालदार व दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे. नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांनी माय लेकीची भेट घडवून आणणाऱ्या केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत बाजारपेठ येथे एक महिला मानसिक संतुलन बिघडलेले अवस्थेत एकटीच फिरताना दिसून आली. बाजारपेठ येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दामिनी पथकाच्या म. पो. हवा. सरोजिनी सावंत, म. पो. हवा. प्रीती ओमले, म. पो. हवा. मोनिका शेरामकर यांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. नंतर तिला जेवण देऊन वैदयकीय मदत करून तिला शांत करून नागोठणे पोलीस ठाण्यात आणले. या महिलेकडे सखोल चौकशी केली असता तिची आई जयश्री बाळासाहेब थोबडे यांचा मोबाईल नंबर तिने पोलिसांना दिल्यानंतर त्यावर व्हिडिओ कॉल केला असता त्यांनी सदर महिलेला ओळखुन ती महिला त्यांचीच मुलगी प्रियांका बाळासाहेब थोबडे, वय ४० वर्ष, रा. शाहीर वस्ती, तुळजापूर वेस, सोलापूर येथील असल्याचे तसेच तिचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे तिच्या आईने सांगितले.
पोलिसांनी महिलेच्या आईकडून त्यांचा राहता पत्ता घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उप विभागीय पोलीस अधिकारी, रोहा प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, पो. हा. अथर्व पाटील, म. पो. हवा. सरोजिनी सावंत, म. पो. हवा. प्रीती ओमले, चालक पो. शि. मिलिंद महाडिक आदींचे पोलिस पथक तात्काळ सोलापूर येथील सांगितलेल्या ठिकाणी रवाना होऊन शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास नागोठण्यात सापडलेल्या महिलेला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आली. नागोठणे पोलिसांच्या या जलदगती कारवाईचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.




