गुन्हेगारी वृत्ततांत्रिकनिधनमहाराष्ट्र ग्रामीण

नवऱ्याचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

सोशल मिडियावरील खोट्या प्रेमाचा शेवट झाला मृत्यूने 

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याचा प्रियकराच्या मदतीने काढला काटा

नागोठण्यातील खुनाच्या घटनेने जिल्हा हादरला
सोशल मिडियावरील खोट्या प्रेमाचा शेवट झाला मृत्यूने 
महेश पवार 
नागोठणे : प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते असे बोलले जाते. अशाचप्रकारे
प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आपल्या नवऱ्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने आपल्या प्रियकराच्या व त्याच्या ओळखीच्या तरुणीच्या मदतीने खून करून पुरावा नष्ट करण्याचा करण्याचा गंभीर गुन्हा नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या खून प्रकरणाने नागोठणे विभागासह संपूर्ण जिल्हा हादरला असून सोशल मीडियावर प्रेमाचा बनाव रचून, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या कृष्णा नामदेव खंडवी (वय २३) रा. गौळावाडी, पो. पाबळ, ता. पेण या  तरुणाचा शेवट त्याच्या मृत्यूने झाला आहे. याप्रकरणी मृत तरुणाची पत्नी दीपाली अशोक निरगुडे (वय १९), रा. मोहाची वाडी, पो. पाबळ, ता. पेण, तिचा प्रियकर उमेश सदू महाकाळ (वय २१) रा. बारीमाळ, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक व त्याची मैत्रीण सुप्रिया प्रकाश चौधरी (वय १९) रा. आडगाव देवळा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक यांच्या विरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना  अटक करण्यात आले आहे.
अत्यंत क्लिष्ट स्वरूपाच्या या गुन्ह्यात आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करून, तपासाला वेळोवेळी  वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याने आणि कोणताही धागा दोरा नसतानाही तांत्रिक व वैज्ञानिक तपासाच्या आधारे वेगवान तपास चक्रे फिरवून केवळ ७२ तासांच्या आत नागोठणे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, रोहाचे पोलिस उपअधीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील, उपनिरीक्षक नरेश थळकर, पो. हवा. महेश लांगी, पो. हवा. प्रशांत भोईर, पो. हवा. चंद्रशेखर नागावकर, महिला पो.हवा. मनिषा लांगी, महिला पो. हवा. दिपा पाटील, पो. कॉ. प्रकाश हंबीर यांच्या पथकाने केलेल्या अथक प्रयत्नातून हा गुन्हा उघडकीस आल्याने नागोठणे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
एखाद्या चित्रपटाचे कथानकाला शोभेल अशा प्रकारच्या आणि तपासकामी नाट्यमय घडामोडी घडलेल्या या थरारक गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, नागोठणे पोलिस ठाण्यात १३ ऑक्टोबर, २०२५ रोजी मनुष्य मिसिंग तक्रार दाखल असलेला तरुण कृष्णा खंडवी याची पत्नी दीपाली निरगुडे हिचे उमेश महाकाळ याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम जुळल्याने त्यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते आणि त्यांना लग्नही करायचे होते. माणगाव येथे राहून नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या दीपाली हिचे शिक्षण येत्या काही महिन्यात पूर्ण होणार असल्याने शिक्षण पूर्ण होताच आपल्याला सासरी नवऱ्याकडे जावे लागेल याची कल्पना दीपाली हिला होती.  त्यामुळे नंतर आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आपल्या नवऱ्याचा त्यापूर्वीच काटा काढण्याचे दीपाली व उमेश यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी कुणी कल्पनाही करू शकत नाही अशाप्रकारचे कटकारस्थान तयार केले. 
उमेश याने आपली जवळची मैत्रीण सुप्रिया चौधरी हिला विश्वासात घेऊन तिलाही या कट कारस्थानात  सहभागी केले. ठरल्याप्रमाणे सुप्रिया हिने इंस्टाग्राम वर पायल वारगुडे नावाचे बोगस अकाउंट तयार केले. त्यानंतर तिने कृष्णा खंडवी याच्याबरोबर व्हाईस कॉल करून प्रेमाचे खोटे संबंध जुळविले. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून सुप्रिया हिने वेगवेगळ्या व्यक्तींच्या क्यू आर कोड स्कॅनरवर कृष्णा याच्याकडून दोन हजार रुपये, ८० रुपये व ६० रुपये असे स्वीकारले. सुप्रियाच्या प्रेमाच्या जाळ्यात संपूर्णतः अडकलेल्या कृष्णा याला आपण कधी एकदा सुप्रियाला भेटतोय अशी इच्छा निर्माण झाली.  त्यानंतर या दोघांनी दिनांक १० ऑक्टोबर, २०२५ रोजी नागोठण्यात  भेटायचे ठरविले. त्याच दिवशी उमेश व सुप्रिया हे सोबत मोटार सायकलवर नागोठणे येथे आले व  स्वतःची ओळख पटू नये म्हणून उमेश याने तोंडाला रुमाल व सुप्रिया हिने स्कार्फ बांधून घेतले. त्यानंतर सुप्रिया हिने कृष्णा याला नागोठणे एसटी स्टँडवर बोलविले. तेथे कृष्णा याने आणलेल्या दोन कॅडबरी चॉकलेट सुप्रियाला देऊन तेथे एकमेकांनी आपल्या  प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर प्रेमात वेडा झालेल्या कृष्णा हा उमेश व सुप्रिया यांच्यामध्ये मोटार सायकलवर बसला.
उमेशने मोटारसायकल नागोठण्याच्या पूर्वेकडील बाजूस वासगाव रस्त्यालगत असलेल्या घनदाट जंगलात नेली. त्या ठिकाणी कृष्णा व सुप्रिया हे एकमेकांशी चालत चालत प्रेमाच्या गोष्टी करण्यात दंग झालेले असतानाच उमेश याने त्यांच्या पाठीमागून येऊन कृष्णा याचा ओढणीने गळा आवळून त्याला खाली पाडून त्याच्या पाठीवर व डोक्यावर आपटून मरेपर्यंत गळा आवळून कृष्णा याचा खून केला. कृष्णा निपचिप पडल्यानंतर तो मेल्याची खात्री करण्याकरिता पुन्हा उमेश याने  कृष्णाच्या बुटाची लेस काढून ती मानेभोवती आवळून मानेला बांधून ठेवली व कृष्णा मृत झाल्याची खात्री झाल्याने त्यांच्या कटकारस्थानात ठरल्याप्रमाणे मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मृत कृष्णा याचा चेहरा, हात व छाती वरती कोणतेतरी घातक केमिकल टाकून पुरावा नष्ट केला. तसेच मृत कृष्णा याचे खिशातून त्याचा मोबाईल काढून,  त्यातील सिम कार्ड काढून तो मोबाईल पाली येथे फोडून फेकून दिला. या गुन्ह्यात कोणताही धागा दोरा नसतानाही नागोठणे पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या सीसीटीव्ही प्रणालीच्या फुटेजचे या गुन्ह्यातील तपास कामी मोलाचे सहकार्य झाले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधिक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे व रोह्याचे पोलिस उप अधिक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी हे स्वतः करीत आहेत.
कोणीही संशयित व्यक्तीवर विश्वास ठेवू नये व तोंड बांधलेले, रुमाल बांधलेले व्यक्ती यांच्याबरोबर तसेच सोशल मिडियाचे माध्यमातून ओळख झालेल्या व्यक्तीवर विश्वास न ठेवता स्वतःची खातरजमा करावी व खातरजमा न झाल्यास अथवा काहीही संशयास्पद आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन त्याबाबतची माहिती द्यावी व सदर बाब पोलिसांच्या लक्षात आणून द्यावी असे आवाहन रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!