कायदेविषयकगुन्हेगारी वृत्तनिधनमहाराष्ट्र ग्रामीण
तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपींना १९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी
पोलिस कोठडीच्या तपासात अजून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपींना १९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी
पोलिस कोठडीच्या तपासात अजून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता
महेश पवार
नागोठणे : नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वासगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झाडीत झालेल्या पेण तालुक्यातील पाबळ खोऱ्यातील गौळावाडी येथील तरुणाच्या खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना रोहा येथील फौजदारी न्यायालयात शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी हजर करण्यात आले होते. या तिन्ही आरोपींना न्यायालयाने १९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मृत तरुण कृष्णा नामदेव खंडवी (वय २३) रा. गौळावाडी, पो. पाबळ, ता. पेण या तरुणाचा १० ऑक्टोबर रोजी खून झाला होता. त्यानंतर नागोठणे पोलिसांनी कसून तपास करत या खून प्रकरणातील मास्टर माईंड असलेली मृत तरुणाची पत्नी दीपाली अशोक निरगुडे (वय १९), रा. मोहाची वाडी, पो. पाबळ, ता. पेण, तिचा प्रियकर उमेश सदू महाकाळ (वय २१) रा. बारीमाळ, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक व त्याची मैत्रीण सुप्रिया प्रकाश चौधरी (वय १९) रा. आडगाव देवळा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, रोहाचे पोलिस उपअधीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांनी ही सर्वोत्तम कामगिरी केली होती.
तद्नंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी तिन्ही आरोपींविरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना न्यायालयात हजर केले होते. दरम्यान या तिन्ही आरोपींची दिवाळी पोलिस कोठडीत जाणार असल्याने यादरम्यान पोलिस कोठडीत आरोपींकडे होणाऱ्या चौकशीत व पोलिसांच्या तपासात अजून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




