निवडणूकमहाराष्ट्र ग्रामीण
ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेना एकत्र या वावड्या वैयक्तिक स्वार्थासाठी : किशोरशेठ जैन
वेलशेत येथील बैठकीत विरोधकांचा घेतला समाचार

ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेना एकत्र या वावड्या वैयक्तिक स्वार्थासाठी : किशोरशेठ जैन
वेलशेत येथील बैठकीत विरोधकांचा घेतला समाचार
महेश पवार
नागोठणे : ठाकरे गटाचे नेत खासदार संजय राऊत साहेबांनी एका वृत्त वहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितले आहे की, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते शिंदे गटाशी कधीही युती करणार नाही. शिवसेना एवढी काही गैरगुजरी नाही आणि शिंदे सेनेबरोबर जाण्याइतपत आमच्यावर वाईट दिवस आलेले नाहीत. आम्ही एक वेळ विरोधात बसू पण विकृती असलेल्या शिंदे सेने बरोबर कधी जाणार नाही. महाराष्ट्रातील राजकारणाला लागलेली ही विकृतीची कीड खतम करायची आहे असेही शेवटी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केले असल्याने येथिल उबाठा शिवसेनेच्या काही लोकांनी उठविलेल्या वावड्या या वैयक्तिक स्वार्थासाठी असल्याचा घणाघात जिल्हा परिषद नागोठणे गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार किशोरशेठ जैन विरोधकांवर केला. त्यामुळे नागोठण्यात ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेना कधीही एकत्र येणार नाहीत. या वावड्या नक्की कशासाठी आहेत एवढे कळण्याइतपत नागोठणे शहर व विभागातील जनता व मतदार सुज्ञ असल्याचेही शेवटी किशोरशेठ जैन यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी यांच्या वेलशेत येथील निवासस्थानी जिल्हा परिषदचे नागोठणे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किशोरशेठ जैन व पंचायत समितीच्या उमेदवार समृद्धी संतोष कोळी यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. २५) सायंकाळी गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते, महिला वर्ग व ग्रामस्थांना संबोधित करताना किशोरशेठ जैन बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते शिवरामभाऊ शिंदे, सुधाकर पारंगे, संतोष कोळी, संजय भोसले, संजय काकडे, सुधाकर जवके, रोशन पारंगे, भाई शिर्के, राजेंद्र शिंदे, चंद्रकांत कोळी, नंदकुमार कोळी, नाना बडे, सखाराम घासे, यादव माळी, सखाराम घासे आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

मी शिवसेनेत असताना काय काय कामे केली हे आता विसरून जा. आता मला ए बी सी डी पासून सुरवात करायची आहे. आपल्या नागोठणे विभागाच्या सर्वांगीण विकास कोणाच्या नेतृत्वाखाली होवु शकतो याचा परिपूर्ण अभ्यास करूनच मी माझ्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार सुनिल तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला असून माझ्याकडे विकासाचे पूर्ण प्लॅन तयार आहे. त्यामुळे नागोठणे जिल्हा परिषद मतदार संघात मला व पंचायत समिती मतदार संघात समृद्धीताई संतोष कोळी व सुकेळी गणात योगिताताई शिद यांना भरघोस मतांनी विजयी करून गावागावात विकास गंगा वाहू द्या तसेच ज्यांना समाजाशी काही देणे घेणे नाही त्यांचे लक्ष फक्त ठेकेदारीकडे आहे अशा उमेदवाराला वाटत आहे की, अर्थकरण करून सत्ता मिळते. परंतु हे मोडून काढा असे आवाहन नागोठणे जिल्हा परिषदचे उमेदवार किशोरशेठ जैन यांनी वेलशेत येथे केले. दरम्यान वेलशेत येथील बैठकीत किशोरशेठ जैन यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.




